पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी सत्तारूढ महायुतीने कुठलाही फॉर्म्युला निश्चित केलेला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मांडली. अतिशय चुरशीच्या निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या महायुतीने औपचारिकरित्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही.
त्यामुळे महायुतीच्या गोटातून पुढील मुख्यमंत्र्याविषयी वेगवेगळी वक्तव्ये केली जात असल्याचे दिसते. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाविषयीच्या मुद्द्यावर भाष्य केले.
अधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा किंवा चांगला स्ट्राईक रेट असणाऱ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री बनेल असा कुठला फॉर्म्युला ठरलेला नाही. त्याबाबतचा निर्णय निवडणूक निकालानंतर तिन्ही पक्षांचे प्रमुख घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीनंतर फडणवीस यांना केंद्रात बढती दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयीच्या प्रश्नावर फडणवीस यांनी हसतच उत्तर दिले. भाजप सांगेल ती जबाबदारी मी सांभाळेल. पक्ष सांगेल तिकडे मी जाईल, असे ते म्हणाले.