राज्यात केवळ 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय आमदार मंडळी आपल्या तालुक्याचाही त्यात समावेश करण्याचा आग्रह धरत आहेत.
दुष्काळावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय झाला. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमिती आता वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडल स्तरावर जात आहे.
लवकरच दुष्काळी मंडलांचीही घोषणा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. केंद्राच्या निकषानुसार राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे.
यावरून झालेल्या टीकेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत 900 मंडलनिहाय दुष्काळसद़ृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलाबा येथे दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. कुलाब्यातील सर्वांत जुन्या कोळी वाड्यात दिवाळी साजरी करण्यासाठी आल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, गोरगरीब, सामान्य जनतेच्या आशिर्वादाने आम्ही काम करत आहोत.
शिवसेना शाखेवरून मुंब्रा येथे ठाकरे गट आणि शिंदे गट शनिवारी समोरासमोर आला होता. त्याबद्दल विचारले असता, कालचा दिवस गेला आज नवीन सुरू झाला, असे म्हणत फडणवीसांनी प्रश्नाला बगल दिली.