राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर महिला वर्गाचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 14 ऑगस्टपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र या योजनेवरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीतील पक्षांकडे लाडकी बहिण योजना हे ब्रीद वाक्य नाही. त्यांच्याकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हेच ब्रीद वाक्य आहे, असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. मुंबईत भाजपच्यावतीने रविवारी ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? “तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना या ओवाळणीची किंमत कळणार नाही. आपल्या कष्टाने कुटुंब चालविणाऱ्या भगिनींना विचारा- या पंधराशे रूपयांच्या ओवाळणीने काय काय होते.
तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही काहीच दिले नाही. आम्ही द्यायला लागलो तर नाव ठेवायला सुरुवात केली. आम्ही योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणीही केली. विरोधकांसारखे आम्ही केवळ बोलबच्चन देत नाही. ते फक्त लेना बँक आहे, वसुलीबाज आहेत,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.
विकासित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासित मातृशक्ती विकसित महिला अशा प्रकारचे महिलाकेंद्रित धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे २०२७ नंतर ज्या निवडणुका होतील त्यात महिला प्रतिनिधींना स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत १०० महिला प्रतिनिधी निवडून जाणार असून त्याअधिक महिला प्रतिनिधी लोकसभेत निवडून जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविकास आघाडीतील पक्षांकडे लाडकी बहिण योजना हे ब्रीद वाक्य नाही. त्यांच्याकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हेच ब्रीद वाक्य आहे. मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा, पंतप्रधान झाला तर माझा मुलगा, मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी, अशा दोनच योजना महाविकास आघाडीकडे आहेत.
“लाडकी बहीण योजनेला विरोधक शिव्याशाप देतात. योजनेविरोधात कोर्टात गेले. तसेच योजनेला कसा विलंब होईल असा प्रयत्न केला. आता ही योजना बंद होईल असं ते सांगतायेत. या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. या सरकारने ३१ मार्चपर्यंत निधीची तरतूद ठेवली आहे. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आल्यास ही योजना पुढे सुरू राहणार.
महायुती सरकार असेपर्यंत ही योजना कुणीही बंद करू शकणार नाही, ” असेही फडणविसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या कार्यक्रमाला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुरजी पटेल यांच्यासह मुंबईतील सर्व आमदार आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.