देवेंद्र फडणवीस : “निराश होऊ नका, मी 3 महिन्यांत आपलं सरकार आणतो”

Photo of author

By Sandhya

देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मिळालेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न केला.

तुम्ही निराश होऊ नका, मी 3 महिन्यांत राज्यात आपली सत्ता आणतो, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना,”आपला प्रॉब्लेम झाला तो म्हणजे 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली. त्यामुळे एक निवडणूक हरली तरी कार्यकर्ते खचतात, निराश होतात. पण कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे वागणे सोडावे, आता मी तीन महिन्यात आपलं सरकार आणतो.

आपली लढाई रयतेचा राज्य आणण्यासाठी आहे. त्यासाठी तुम्ही ताकदीने मैदानात उतरा, सहाही जागा आपल्या महायुतीच्या येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील झालेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा पाढाही वाचला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली. त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली.

नागपूर जिल्ह्यात विकासाची गंगा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणली. नळ गंगा योजना आम्ही आणली, त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल. मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आपण विदर्भात आणली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत काम करण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्यांनी म्हटले की, आपले कार्यकर्ते काम चांगले करतात.

मात्र, विरोधकांप्रमाणे आपण मार्केटिंग करत नाही,आता आपली काम तुम्ही दाखवा. हे लोक एवढे हुशार आहे ते निवडणुकीपुरत्या घोषणा करतात, मार्केटिंग करतात. त्यामुळे आता तुम्हीदेखील आपलं मार्केटिंग करा, आपले काम जनतेला दाखवा.

अनेक कार्यकर्ते थकले होते , चालते तर चालू द्या, अशा मनोवृत्तीने काम करत होते. अनेक चमकेश कार्यकर्ते आपल्याकडे आहेत, ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा, अशी तंबीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Leave a Comment