देवेंद्र फडणवीस : ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही

Photo of author

By Sandhya

देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून राजकीय वातावरण तापले असताना, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मागील दाराने ओबीसीत एंट्री होत असल्याचे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. त्यामुळे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह काही ओबीसी नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली असता, त्यांना या भेटीत दिलासा मिळाला.

जातनिहाय जनगणनेबाबत मुद्दा आला असता फडणवीस यांनी बिहारमधील जातनिहाय जनगणनेत त्रुटी असल्याचे सांगितले. मात्र, राज्यात पारदर्शकपणे जातनिहाय जनगणना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या ओबीसी नेत्यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली.

भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेला ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दर्शवत त्यांचे समर्थन केले. या शिष्टमंडळाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचीही भेट घेतली.

सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत आणण्याचा घाट घातला जात असल्याबद्दल विरोध करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होत आहे. या बैठकीत भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाने पूर्णपणे भुजबळांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment