गेल्या काही दिवसांपासून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी खळबळजनक दावे केले असून, यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
राजकीय फायद्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मविआतील नेत्यांकडून माझ्यावर दबाव आणला जात होता, असा मोठा दावा परमबीर सिंग यांनी केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी एवढेच सांगेन की, त्यांनी मला आणि भाजपातील काही नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केले आहे, ते पूर्णपणे सत्य आहे. याचा सगळा प्रयत्न झाला. त्यांनी एकच घटना सांगितली.
परंतु, असे चार इन्सिडंट आहेत. यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल, याचे षडयंत्र झाले. हे सगळे षडयंत्र झाले, त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आजही अनेक व्हिडिओ पुरावे आहेत या सगळ्याचे व्हिडिओ पुरावे आम्ही सीबीआयला दिले. आजही अनेक व्हिडिओ पुरावे आहेत. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मी असेन, गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील, असे आमचे अनेक नेते आहेत, ज्यांना जेलमध्ये टाकायची सुपारी काही अधिकाऱ्यांना दिली होती.
काही अधिकाऱ्यांनी घेतली होती. परंतु, ती गोष्ट ते करू शकले नाहीत. कारण, अनेक चांगले अधिकारी होते, ज्यांनी त्या त्या वेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, मला एकदा मातोश्रीवर बोलावले होते, तिथे अनिल देशमुख उपस्थित होते.
मुंबई बँकेप्रकरणी प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मला सांगितले. मात्र या प्रकरणात तपास पूर्ण झाला होता. तिथेही मी गुन्हा दाखल करण्यास साफ नकार दिला. राजकीय विरोधकांविरोधात पोलिसांचा वापर करण्याचा प्रयत्न वारंवार मविआ नेत्यांनी केला. जयंत पाटील यांच्या ऑफिसलाही मला बोलावले होते.
माझ्यावर मविआ सरकारने त्यांच्या राजकीय विरोधकांवर बेकायदेशीर कारवाई करण्यासाठी दबाव आणला गेला. अनिल गोटे हे माजी आमदार आहेत, त्यांची सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्यासोबत अनिल देशमुखांच्या बंगल्यावर बैठक झाली होती.
जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा याचा दबाव होता. मी त्यास नकार दिला, त्यानंतर मला सिल्वर ओकवर बोलवले गेले. त्याठिकाणीही अनिल देशमुख आणि ही मंडळी उपस्थित होती. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती, असे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.