२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. मात्र यावेळी तो वाटा उलचण्यात आपल्याला अपयश आले. यंदाच्या निवडणुकीत आपली काही गणिते चुकली. त्यामुळे नव्याने पुनरावलोकन करावे आणि नवी रणनीती यावी यासाठी आजची बैठक घेतली. जे अपेक्षित होते ते यश आले नाही.
त्यामागची कारणे शोधून ते अपयश दूर करता येईल तसेच विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार कसे आणता येईल याचा निर्धार आपण केला आहे. आता पाऊस सुरू असताना ते जे पेरलं तेच उगवतं. आपल्याला नव्याने पेरणी करण्याची वेळ आली आहे अशी भूमिका भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत भाजपच्या आमदारांसमोर फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या तयारीबाबतही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की यशाचे श्रेय सगळेच घेतात. मात्र अपयशही ताकदीने अंगावर घ्यायचे असते. ते पचवून नवीन निर्धार करायचा असतो. राज्यात पक्षाचे नेतृत्व मी करत होतो त्यामुळे पक्षाच्या अपयशाची जबाबदारीही माझी होती.
तेच मी त्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले आणि पक्षाच्या बांधणीसाठी मला सरकारमधून मोकळे करण्याची भूमिका मांडली. तुम्ही सगळ्यांनी लोकसभा निवडणुकीत चांगले काम केले. मात्र राजकीय गणितात आपण कमी पडलो. ते कसे कमी पडलो तेही मी सांगितले आहे. मला पक्षाचे काम करण्यासाठी मोकळे करा हे मी नैराश्यातून म्हटले नव्हते.
मी पळ काढणाऱ्यातला नाही. चारही बाजूंनी घेरले गेल्यावर ज्यांनी पुरंदरचा तह केला आणि नंतर पुन्हा सगळे किल्ले जिंकले ते छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटत असेल की मी नैराश्यातून किंवा भावनेच्या भरात राजीनाम्याबाबत बोललो असेल.
मात्र त्यावेळी आपल्या डोक्यात एक रणनीती होती. त्यावरच मला काम करायचे होते. मी अमित शहा यांना भेटलो. त्यांनाही माझा विचार सांगितला, मात्र सध्या ही वेळ नसल्याचे त्यांनी म्हटले. आपण नंतर एकत्र बसून महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करू असे त्यांनी म्हटले आहे व आपण दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागलो.
उद्धव ठाकरेंवर टीका लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आपली मते वाढली आहेत. राज्यातील उद्योग गुजरातला पळवण्यात आल्याचा नॅरेटीव्ह पसरवण्यात आला. प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र खाली गेला होता. त्यांना जर सहानुभूती होती असे म्हणतात तर मग ती कोकणात का दिसली नाही? कोकणात उबाठाला एकही जागा मिळाली नाही.
पालघर, रत्नागिरी, ठाण्यात यांना एकही जागा मिळाली नाही. मुंबईत मराठी माणसाने यांना मतदान केले नाही. त्यांना कोणी मतदान केले हे तुम्हाला माहिती आहे. केवळ एका विशिष्ट मतांच्या आधारावर ते जिंकले असेही फडणवीस यांनी नमूद केले.