राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी भाजपच मोठा भाऊ आहे, असे सूचक वक्तव्य करून भाजपला राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे आतापासून कामाला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र येण्याआधीच विरोधकांत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. ममता बॅनर्जी या बंगालमध्ये काँग्रेसला येऊ द्यायला तयार नाहीत. केजरीवाल दिल्ली आपलीच असल्याचे सांगत आहेत.
त्यामुळे विरोधकांची मोट कधीही फुटू शकते, असा दावा त्यांनी केला. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून केंद्र स्तरावर ठरलेल्या रचनेसंबंधीचे मार्गदर्शन राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
आरक्षणावरून अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात जातीय आरक्षणाचे मुद्दे पुढे करुन अस्वस्थता निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
आरक्षणाचे सर्व विषय राज्य सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे. त्यातून योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आपण मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले. हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकवून दाखविले.
युतीचे सरकार असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही हे आरक्षण रद्द झाले नव्हते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आरक्षण गमावले आणि तेच आम्हाला प्रश्न विचारत आहेत. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णयही आपल्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाला.
ओबीसींसाठी जे 27 जीआर निघाले त्यातील 21 आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तर 6 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात निघाले. महाविकास आघाडी सरकारने एक तरी जीआर काढला असेल तर दाखवून द्यावा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.
राज्य सरकार मराठा, ओबीसी, धनगर असो की आदिवासी समाज असो सर्वांना न्याय देईल, असे फडणवीस यांनी सांगितले. आरक्षणाच्या मुद्यावरून समाजाला एकमेकांच्या समोर उभे करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत.
पण महाराष्ट्राला ते परवडणारे नाही. कारण आरक्षणाने काही जणांना संधी मिळेल, पण राज्याचा विकास झाला तर त्यापेक्षा जास्त लोकांना संधी मिळेल. तेव्हा सर्वांनी संयम बाळगावा, असे फडणवीस म्हणाले.