डिजिटल अरेस्ट करुन घेतले ५० लाख; महाराष्ट्राच्या माजी अधिकाऱ्याने पत्नीसह स्वतःला संपवलं

Photo of author

By Sandhya

Karnataka Crime: सायबर गुन्हेगार गेल्या काही दिवसांपासून वृद्धांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार डिजिटल अरेस्टच्या नावाखाली वृद्धांना गंडा घालत आहे.

मात्र आता या डिजिटल अरेस्ट प्रकरणामुळे एका वृद्ध जोडप्याने स्वतःला संपवलं आहे. कर्नाटकच्या बेळगावमध्ये एका वृद्ध जोडप्याने सायरब फ्रॉडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्या करणारी व्यक्ती महाराष्ट्र शासनामध्ये माजी अधिकारी होती.

कर्नाटकातील बेळगावी येथे एका वृद्ध जोडप्याने डिजिटल अरेस्टला कंटाळून एका जोडप्याने आत्महत्या केली. वृद्धाची सायबर फसवणूक झाल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी सतत धमक्या दिल्या होत्या. यानंतर मानसिक तणावामुळे वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली. दिल्ली क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी वृद्धाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती. आरोपींनी वृद्ध दाम्पत्याकडून ५० लाखांहून अधिक रक्कम लुटल्याचा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वृद्ध जोडप्याचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त होते. निवृत्त सरकारी कर्मचारी आणि त्याची पत्नी हे गेल्या तीन महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांमुळे हैराण झाले होते. डिजिटल अरेस्टमध्ये अशाप्रकारे मृत्यूची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ८३ वर्षीय डिएगो सँटन नाझरेथ आणि त्यांची पत्नी फ्लावियाना यांचे मृतदेह बेळगावी येथील खानापूर येथील त्यांच्या राहत्या घरी आढळून आले. निवृत्त दाम्पत्य पूर्वी महाराष्ट्र मंत्रालयात कार्यरत होते आणि त्यांना जवळचे नातेवाईक नव्हते.

दिल्ली क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी जानेवारीमध्ये वृद्ध जोडप्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून जोडप्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. तुमचा मोबाईल आयडी आणि कागदपत्रे काही गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरली गेली आहेत. त्यामुळे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील, असं वृद्ध दाम्पत्याला सांगितले. घाबरलेल्या दाम्पत्याने ही रक्कम आरोपींना दिली. मात्र त्यानंतर धमक्या आणि पैशाची मागणी वाढत गेली. आरोपींनी वेगवेगळ्या बहाण्याने त्यांची ५० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page