एक मशीनगन, देशी 20 पिस्तुल, 2 मॅगझीन आणि 280 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त

Photo of author

By Sandhya

मशीनगन

वागळे स्टेट पोलीस ठाण्यात दाखल हत्यार विक्री गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपीस ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील पळासनेर या गावातून अटक केली.

या संशयीत आरोपीच्या ताब्यातून एक मशीनगन, देशी बनावटीचे 20 पिस्तुल, 2 मॅगझीन आणि 280 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला.

ठाण्यातील वागळे स्टेट पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी सुजितसिंग उर्फ माजा आवसिंग (27, राहणार-उमरटी गाव, ता. वरला, जिल्हा बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या विरोधात हत्यार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल आहे. हा संशयीत आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

दरम्यान, हा फरार संशयीत आरोपी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील व धुळे जिल्ह्यातील पळासनेर या गावात पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील धुळे जिल्ह्यात असलेल्या पळासनेर या गावात पोहचले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने 11 जुलै रोजी संशयीत आरोपीस सापळा लावून अटक केली. यावेळी आरोपीच्या ताब्यात एक देशी बनावटीची मशीनगन, 20 देशी बनावटीचे पिस्तुल, दोन मॅगझीन, 280 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा मिळून आला.

हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा, वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page