एकनाथ शिंदे : “सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी”

Photo of author

By Sandhya

एकनाथ शिंदे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाप्रचंड विजय झाला. या विजयानंतर अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे, तर दुसरीकडे भाजपदेखील या पदावर दावा करत आहे.

मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यामुळे ते मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, आता अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण भेटत आहोत. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नव्हता. जे काही अडीच वर्षात महायुतीने काम केले, लोकांनी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. ‘

मी मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन’पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता काम करतात, तसे मी कार्यकर्ता म्हणून काम केले. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि आजही करत आहे. मी स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही, कॉमन मॅन म्हणून काम केले. एकीकडे जी विकास कामे महाविकास आघाडीने थांबवली होती, ती आम्ही सुरू केली आणि कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली.

त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. लाडकी बहिणींचा लाडका भाऊ मी झालो. ही माझी ओळख निर्माण झाली. ही ओळख माझ्यासाठी सर्वात मोठी आहे.’

भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा’भाजपने मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसोबत फोनवर चर्चा झाली. त्यांना मी सांगितलं की, सरकार बनवताना माझा कोणताही अडसर येणार नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल.

तुम्ही आम्हाला मदत केली, अडीच वर्षे संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय मला महायुतीचा प्रमुख म्हणून मान्य असेल. भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील, ज्याला मुख्यमंत्री करतील, त्याला पूर्ण शिवसेनेचे समर्थन आहे’, असेही एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले. 

Leave a Comment