माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुबईतील रंगशारदा येथे शाखा प्रमुखांचा मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
तर फडणवीसांनी वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली आहे. आता या प्रकरणात उडी घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीसांची बाजू घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे नाव न घेता म्हणाले, “घरात बसून आणि फेसबुक लाईव्ह करून काही होत नसते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा घरात बसणाऱ्यांनी करू नये.”
दरम्यान काल झालेल्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या मेळाव्यात ठाकरे म्हणाले होते की, “मला आणि अदित्यला खोट्या आरोपांवरून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता.” यावेळी ठाकरे फडणवीसांचा उल्लेख टाळत म्हणाले होते की, “एकतर तू राहशील नाहीतर मी.”
अनिल देशमुखांचे आरोप दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला होता की, फडणवीस यांनीच त्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांना तुरुंगात टाकण्याची योजना आखली होती.
माजी गृहमंत्री देशमुख यांनी आरोप केला होता की फडणवीस यांच्या मध्यस्थीने त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या लोकांविरुद्ध प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले होते. देशमुख यांनी केलेल्या या खुलाशानंतर ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले आहे.