Emotional atmosphere in Baramati, Maharashtra, one month after Ajit Pawar’s death


बारामतीत अजित पवार यांच्या स्मृतीस अभिवादन बारामतीकर अजूनही शोकमग्न
बारामती – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला.या दुर्दैवी घटनेचा धक्का बारामतीकर अजूनही विसरू शकलेले नाहीत.या पार्श्वभूमीवर शहरात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने नटराज कला दालन येथे सकाळी सहा वाजता बारामतीतील विविध भजनी मंडळांच्या सहभागाने भजन कार्यक्रम संपन्न झाला.त्यानंतर प्रद्युम्न शिरसागर,आबा परकाळे,दुर्गा प्रसाद कुलकर्णी,सुवास अष्टपुत्रे आदी कलाकारांनी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला.सकाळी आठ वाजता सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली.नऊ वाजता, ज्याक्षणी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला होता,त्या वेळेस उपस्थितांनी ‘पसायदान’चे सामूहिक गायन केले. त्यानंतर शांत उभे राहून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाला नटराज नाट्यकला मंडळाच्यावतीने अजितदादांची प्रतिमा भेट देण्यात आली.कार्यक्रमाची सांगता शांततेत करण्यात आली.तसेच संस्थेच्या वतीने सायंकाळी सात वाजता ह.भ.भ.आकाश कामठे (जेजुरी) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.या कीर्तनालाही बारामतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
अशा प्रकारे अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त बारामती शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.