पुणे :
शिक्षक विभागाच्या सचिवांच्या नावाने बनावट अध्यादेश काढून पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील अनेक माध्यमिक शाळांमधील ५० शिक्षकांची वेतनवाढ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीत लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात १९ ऑक्टोबर ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. दीपक चांदणे या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांमधील ‘एटीडी’ पदविका मिळवलेल्या कला शिक्षकांनी वरिष्ठ पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला होता. डॉ. चादंणेने शिक्षण विभागात ओळख असल्याचे भासवले.
शालेय शिक्षण विभागाचे सचिव प्रवीण मुंढे यांच्या नावाचा बनावट अध्यादेश तयार केला. त्याचा संदर्भ देवून त्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने आदेश तयार केला. ही बाब शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या प्रकरणाची छाननी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
याबाबत चौकशीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांनी १७ लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगून आरोपीने शिक्षकांकडून पैसे गोळा केल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. या प्रकरणात डॉ. चांदणे याच्यासह आणखी काहीजण सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.