


जेजुरीत दीडशे वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामदेवता जानाई देवीच्या यात्रेला आज पासून सुरुवात
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्राम देवता व जागृत श्रद्धास्थान असणाऱ्या जानाई देवीच्या यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे.
जेजुरीत खंडोबा देवाच्या वर्षाकाठी दहा यात्रा भरतात. मात्र गेली दीडशे वर्षापासून जानाई देवीची यात्रेला खंड पडला होता.
जेजुरी नगरीत नुकतेच सुमारे चार कोटी रुपये खर्चून ग्रामदेवता जानाई देवीचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. जेजुरी ग्रामदेवता सार्वजनिक जानाई देवी मंदिर ट्रस्ट , श्री खंडोबा पालखी सोहळा समिती व ग्रामस्थांच्या वतीने देवीची यात्रा भरविण्याचा निर्णय घेतला.
दिनांक 10 ते 12 या कालावधीत देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून देवीचा धार्मिक विधी, मिरवणूक, छबिणा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्यांचे आखाडा, बैलगाड्या शर्यत आदी कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आज सकाळ पासून देवीच्या मंदिरात पूजा अभिषेक, धार्मिक विधी सुरू असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
मंदिरात धार्मिक विधीचे पौरोहित्य वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, प्रसाद खाडे, योगेश खाडे, शेखर सेवेकरी,अतुल आगलावे, गणेश आगलावे, चेतन सातभाई ,अनिरुद्ध आगलावे आदींनी केले.
या यात्रेचे आयोजन जानाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोडसे, श्री खंडोबा पालखी सोहळा व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मंगेश घोणे, व पदाधिकाऱ्यांनी केले.