जी-20 परिषदेंतर्गत आज पुण्यातली शेवटची बैठक

Photo of author

By Sandhya

जी-20

जी-20 परिषदेंतर्गत शहरात होणारी शेवटची बैठक 19 ते 22 जूनदरम्यान होणार आहे. शिक्षणक्षेत्रावर होणार्‍या या बैठकीसाठी 34 देशांतील शिक्षणमंत्री आणि अधिकारी सहभागी होणार असून, त्यात 14 देशाच्या मंत्र्यांचा समावेश आहे. या पाहुण्यांच्या हेरिटेज वॉक आणि योगाचे आयोजन केले आहे.

तसेच राष्ट्रीय महारेरा परिषदेचेही आयोजन केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. जी-20 परिषदेतील तीन बैठका पुण्यात घेण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले होते. त्यातील दोन बैठका यशस्वीरीत्या झाल्या असून, शेवटची शिक्षणविषयक बैठक 19 ते 22 जूनदरम्यान होणार आहे.

यात 19 व 20 तारखेला सहभागी देशांचे सचिव व अन्य प्रतिनिधी, तर 21 व 22 तारखेला मंत्री सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी 34 देशांचे प्रतिनिधी व त्यातील 14 देशांचे मंत्री असे एकूण 250 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या मंत्र्यांसाठी 20 तारखेला पुण्याची वारसा फेरी (हेरिटेज वॉक) व 21 तारखेला आगाखान पॅलेसला भेट, 20 तारखेला राज्य शासनातर्फे, तर 21 तारखेला केंद्र शासनातर्फे मेजवानीचे आयोजन केले जाईल.

या मेजवानीसह इतर कार्यक्रमांना शहरातील आघाडीचे उद्योजक, नामवंत अशा 70 व्यक्तींनाही केंद्रातर्फे निमंत्रित केले जाणार आहे. तर 21 तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार्‍या योग प्रात्यक्षिकांमध्येही हे परदेशी पाहुणे सहभागी होतील, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, 21 व 22 तारखेला महारेरा कायद्यासंदर्भात एक राष्ट्रीय परिषद पुण्यात होणार आहे. यामध्ये सहभागी होणार्‍या प्रतिनिधींसाठीही पुणे महापालिकेतर्फे 21 तारखेला वारसा फेरी आयोजित केली जाईल.

Leave a Comment