गांजा घेऊन शहरात विक्रीसाठी आलेल्या तीन कॉलेज तरुणांना बेड्या

Photo of author

By Sandhya

गांजा घेऊन शहरात विक्रीसाठी आलेल्या तीन कॉलेज तरुणांना बेड्या

गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांतून गांजा घेऊन शहरात विक्रीसाठी आलेल्या तीन कॉलेज तरुणांना गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने नगर रस्ता भागातून बेड्या ठोकल्या.

त्यांच्याकडून 11 लाख 14 हजार रुपये किंमतीचा 55 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. राम राजेश बैस (वय 20, गडचिरोली), ऋतिक कैलास टेंभुर्णे (वय 21, रा. गौराळा, जि. भंडारा), निकेश पितांबर अनोले (वय 22, रा. कस्तुरबा वॉर्ड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे अमलीपदार्थ विरोधी पथक नगर रस्त्यावरील खराडी भागात रविवारी गस्त घालत होते.

त्या वेळी तिघे जण गडचिरोलीतून गांजा घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस हवालदार चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे यांना मिळाली.

खराडी बाह्यवळण मार्ग परिसरात पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. ही कारवाई उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक फौजदार शिवाजी घुले, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांनी केली.

Leave a Comment