गेल्या दहा वर्षांत मान्सून यंदा सर्वांत उशिरा शहरात दाखल झाला आहे. या आधी 2019 मध्ये 24 जूनचा रेकॉर्ड होता. तो मोडत 25 जून हा नवा विक्रम त्याने स्थापित केला आहे.
अवघ्या चोवीस तासांत शहरात 24 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या वेशीवर घुटमळत असलेला मान्सून अखेर रविवारी पुण्यात आल्याची घोषणा पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी केली.
दरम्यान, 30 जूनपर्यंत शहरासह घाटमाथ्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी रेनकोट, छत्री जवळ ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून मान्सून शहराच्या वेशीवर अडकला होता. पश्चिमी वार्यांचा जोर कमी असल्याने तो शहरासह जिल्ह्यात येत नव्हता. अखेर रविवारी 25 जून रोजी तो मुंबई व पुणे शहरात एकाच वेळी दाखल झाला.
यंदा त्याने गेल्या दहा वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले. या आधी 2019 मध्ये 24 जून रोजी तो सर्वांत उशिरा आल्याची नोंद होती. 2016 मध्ये 20 जून रोजी दाखल झाला होता.