घरात विजेचा धक्का बसून विवाहितेचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

विजेचा

घरात विजेचा धक्का बसून विवाहितेचा मृत्यू झाला. नगर तालुक्यातील देहरे गावच्या शिवारातील लांडगेवस्ती येथे गुरुवारी (दि. 8) सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.

दुर्गा गणेश लांडगे (वय 25, रा. लांडगेवस्ती, रा. देहरे) असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचे पती गुरूवारी सकाळी एमआयडीसीत कामावर गेले होते. तिचे सासरे कामानिमित्त गावात गेले होते.

तर, सासू एका कार्यक्रमाला बाहेरगावी गेलेली होती. दुर्गा व तिचा तीन वर्षांचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी असे तिघेच घरी होते. सकाळी 10.30 च्या सुमारास घरातील वीजपुरवठा अचानक बंद झाला.

त्यामुळे वीजपुरवठा का बंद झाला, हे पाहण्यासाठी ती घराच्या गच्चीवर गेली असता, तेथे विजेचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळाने शेजारी राहणार्‍या ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी सरपंच बबन करंडे यांना माहिती दिली.

त्यांनी तसेच तंटा मुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल पठारे, माजी पंचायत समिती सदस्य व्ही.डी काळे, महेश काळे, माजी सरपंच संजय लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

महावितरणच्या कर्मचार्‍यांना व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ तेथे धाव घेत वीजपुरवठा खंडित केला. दुर्गा लांडगे हिला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Leave a Comment

You cannot copy content of this page