सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना मोडीत काढायची आहे. म्हणूनच आम्ही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय.
मात्र, सरकार लोकांच्या दारोदारी फिरतय अशी टीका काही जण करताय. परंतु सत्ता ही लोकांच्या दारोदारी फिरुन काम करण्यासाठी असते. घरात बसण्यासाठी सत्ता नसते, घरी जे बसतात व घरातून जे काम करताय त्यांना जनता घरी बसवते असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
नाशिकमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले आम्हाला लोकांच्या दारात जायला लाज वाटत नाही. बाळासाहेब म्हणायचे लोकांपर्यंत जा. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जातोय.
युती सरकारने सगळे निर्णय जनतेच्या हिताचे घेतले. लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला पाहीजे यासाठी निर्णय घेतले. कुठलाही निर्णय लोकप्रतिनिधींच्या हिताचे आम्ही घेत नाही.
काहींना वाटतं तीनजण एकत्र आले, यांचे कसे होणार पण आम्ही समजदार आहोत. देवेंद्रजींचे मन फार मोठे आहे. हा फार मोठ्या मनाचा माणूस आहे. सत्तेत दुसरा मुख्यमंत्री आला तोही त्यांनी हसतमुखाने स्विकारला.
त्यांच्या अनुभवाचा आम्ही जनतेसाठी उपयोग करुन घेत आहोत. अजित पवारांमुळे सरकार अधिक वेगाने निर्णय घेईल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश पुढे जातोय, महातसत्तेकडे जातोय, मोदी जातात तिथे त्यांचे स्वागत होते आहे.
खेटे मारण्याची प्रथा बंद करण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम आहे. कोणी कितीही आरोप केले तरी आम्ही आमचे काम थांबवणार नाही. कितीही अडथळे आले तरी हा कार्यक्रम सुरु राहील असे मुख्यमंत्री म्हणाले.