महायुतीतील मित्रपक्षांशी समन्वय राखण्याची जबाबदारी भाजपने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. महायुतीमध्ये भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. त्यातील १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास असलेल्या ८५ जागा भाजपाने काढल्या असून, त्यावर लक्ष केंद्रित करताना गेल्यावेळी जिंकलेल्यांपैकी २५ जागांवर यावेळी अधिक मेहनत करावी लागणार असल्याचा सूर पक्षाच्या विविध बैठकांमध्ये व्यक्त होत आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मुख्यमंत्री होणार असेल, तर आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
मीडियाशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, आम्ही महायुतीकडून निवडणूक लढवत आहोत सगळे आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आमचा मुख्यमंत्री होईल असे कोणी बोलू नये तो निर्णय महायुतीचा असेल, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
येत्या पंधरा ते वीस दिवसांत आचारसंहिता लागेल येत्या पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता लागेल. भाजपामध्ये एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्र फडणवीस होतील. पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत.
पण आमच्या मनातील मुख्यमंत्री भाजपाचा असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, असे सांगत महायुतीचा विजय होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. दरम्यान, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुक्तिसंग्राम दिनी सहावे उपोषण सुरू केले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, जे नियमात आहे तेच सरकार करू शकते. नियमबाह्य काहीही करू शकत नाही. न्यायालयही त्याला मान्यता देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक भूमिका आहे, असे महाजन यांनी सांगितले.