‘ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही, हे मनोज जरांगे यांना कळत नाही, तर त्याला काय करणार. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे,’ असे मत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. जरांगे यांचे आंदोलन थांबत नसल्याने ते सरकारचे अपयश आहे, असे म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले.
निर्मल वारीचा आढावा घेण्यासाठी ते पुण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण, आंदोलन केले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत जे काही करायचे होते, ते सर्व काही केले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. तसेच, मराठा आरक्षणाच्या बाबतीत ५० वर्षांत कोणी प्रयत्न केले का? शरद पवार यांनी तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, असे सांगितले होते. आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे.
पण, जरांगे पाटलांचे समाधान होतच नसेल, तर आता आम्ही काय करणार? सगेसोयऱ्यांना पण आरक्षण द्या. पण, ते न्यायालयामध्ये टिकणारच नाही. तसेच, माझ्या माहितीप्रमाणे अशाप्रकारे आरक्षण देता येत नाही. पण, त्यामध्ये काही करता येत असेल, तर सरकार निश्चित प्रयत्न करेल.’
मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात भाजपने वाद लावला, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्याबाबत ‘आता जो तो त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. ही आंदोलने कशाप्रकारे उभी राहिली आहेत याबाबत सुळे यांनाही माहिती आहे.
दोन समाजात द्वेष, दुही निर्माण होईल, अशा प्रकारची विधाने कोणीही करू नये, असा सुळे यांना महाजन यांनी सल्ला दिला. मराठा आरक्षणाविरोधात लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले आहे.
त्याकडे लक्ष वेधता, ‘सरकारने ओबीसी समाजाची दखल घेतली नाही असे नाही. अनेक मंत्री तेथे जाऊन आले आहेत मी पण त्या ठिकाणी जाणार आहे. आम्ही दखल घेतली आहे. हाके यांनी उपोषण सोडावे’, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.