विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकूणच राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी न मिळालेले नाराज नेते लगेचच दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊनही अद्यापपर्यंत महाविकास आघाडी किंवा महायुतीने सर्व जागांवरील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अशातच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेपासून फारकत घेतली आणि भाजपासह महायुतीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर वर्षभरातच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी करत महायुतीला पाठिंबा दिला.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली. इंदापूर येथील उमेदवारी मिळणार नाही, हे निश्चित झाल्यावर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला आणि तिकीट पक्के केले.
उमेदवारी निश्चित झाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करत हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे औक्षण केले. तसेच अर्ज भरतानाच्या रॅलीत सहभागही घेतला.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही गुरुपुष्यामृत असल्याने आज मी अर्ज भरत आहे. मला विश्वास आहे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवेल. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.
गेल्या दहा वर्षात इंदापूर तालुक्यावर झालेला अन्याय आणि झालेल्या अधोगती दूर करणे, इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास, सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण, सामाजिक परिवर्तन हेच आमचे धोरण राहील, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रवीण माने यांच्या नाराजीबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हमाले की, लोकशाहीमध्ये सगळ्यांना इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार असतो, सगळ्यांची नाराजी दूर होईल.
प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे आमच्या जवळचे आहेत त्यामुळे लवकरच त्यांची नाराजी दूर करू. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसते, शरद पवार यांच्या आणि सुप्रिया सुळे यांचे शब्द ते नक्की मानतील, बंड थांबेल अशी मला खात्री आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.