पुरंदर भाजपकडून सासवडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध.

Photo of author

By Sandhya

Harshvardhan Sapkal strongly protests for help from Purandar BJP.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अठराव्या शतकातील क्रूरकर्मा शासक टिपू सुलतानची तुलना थेट युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या ‘घाणेरड्या’ वक्तव्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या आणि महाराष्ट्रवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, याचा निषेध करण्यासाठी पुरंदर-हवेली भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी (ता. १६) सासवड येथील शिवतीर्थावर आक्रमक निदर्शने करण्यात आली.

सोमवारी सकाळी भाजपच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर सपकाळ यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “स्वराज्य संस्थापक शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असे वक्तव्य करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा घोर अपमान आहे,” असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी यावेळी घेतला.

या निषेध आंदोलनाप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, निरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, शैलेश तांदळे, शहराध्यक्ष आनंद जगताप, संभाजी काळाणे, मंडल अध्यक्ष संजय निगडे, संदीप कटके आणि साकेत जगताप उपस्थित होते. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हरीभाऊ लोळे, अजय इंगळे, शैलेंद्र ठकार, विठ्ठल मोकाशी, चंद्रकांत बोरकर, तुषार ढुमे, सागर जगताप, तुषार जगताप, संपत जाधव, हर्षवर्धन पायगुडे यांसह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुरंदरच्या राजकीय वर्तुळात या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. “ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करून एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण करणे आणि त्याची तुलना महाराजांशी करणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी,” अशी मागणी यावेळी भाजपाच्या पदाधिका-यांनी केली.

फोटोओळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करताना भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे व अन्य पदाधिकारी.

Leave a Comment

You cannot copy content of this page