हसन मुश्रीफ : “…तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात ईश्वरालाही शक्य होणार नाही”

Photo of author

By Sandhya

हसन मुश्रीफ

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या विरुद्ध संजय मंडलिक अशी लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे.

संजय मंडलिक यांच्या प्रचाराची कोल्हापूरच्या सेनापती कापशी येथे शुक्रवारी (५ एप्रिल) सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले? “या निवडणुकीत आपल्याला विधानसभेएवढे मतदान घ्यावे लागेल. दोघांना मिळून जेवढे मतदान पडले होते, तेवढे मतदान आपल्याला या निवडणुकीत मिळवावे लागेल. एक लाख किंवा सव्वा लाख मताधिक्य आपण घेतले तर संजय मंडलिक यांचा पराभव करणं प्रत्येक्षात भगवानालाही शक्य होणार नाही.

अशा प्रकारची व्यूहरचना आपण करायची आहे. मी अनेकवेळा विनोदाने म्हणतो की, मुंबई असूद्या, पुणे असूद्या किंवा अमेरिका असूद्या, गरज पडली तर हेलिकॉप्टरने माणसे आणू, पण संपूर्ण मतदान आपण घेऊ आणि निश्चतच संजय मंडलिक यांना विजयी करू”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच उमेदवाराच्या विरोधात न बोलण्याचा सल्ला दिला. याबरोबरच आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या कृतीमधून कोणत्याही चुकीच्या गोष्टी जाता कामा नाही, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.

मुश्रीफांच्या विधानावर जयंत पाटील काय म्हणाले? पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, “हेलिकॉप्टरने मतदार आणू म्हणजे मतदारांची सर्व व्यवस्था करायची ठरवलेली दिसते.

आमच्या विरोधकांकडे भरपूर घबाड असल्याचे यावरुन दिसते. त्यामुळे आमचे विरोधक पैशाने किती गब्बर आहेत, हेही यावरुन दिसते”, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी मुश्रीफ यांना लगावला.

Leave a Comment

You cannot copy content of this page