राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांची पक्षातील अजित पवारांची जागा घेण्याची महत्त्वकांक्षा असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
मुश्रीफ यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळींना पेव फुटले आहे. हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, रोहित पवार राजकारणात नवखे आहेत.
त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे. ते कशासाठी एवढे धाडस करत आहेत, त्यांनी ते करू नये. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे 6 आमदार होते. आता कमी झालेत.
पुण्यातही अशीच परिस्थिती आहे. आरोप करण्यासाठी जागा नसल्यामुळे असे बारके आरोप करतात. मला 1998 मध्ये कुणाचा विरोध होता हे त्यांनी जाहीरपणे सांगावे. मंडलीक साहेब तर माझ्यासोबतच होते, असे मुश्रीफ म्हणाले.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या शुक्रवारच्या कोल्हापुरातील सभेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवार यांची कोल्हापूरच्या दसरा चौकात सभा होणार आहे.
पवारांना एवढ्या छोट्या मैदानात आणण्याची गरज नव्हती. त्या मैदानात केवळ 5 हजार जण बसू शकतात. त्यांच्या सभेला गर्दी गोळा व्हावी अशा आमच्या शुभेच्छा.
दरम्यान पवारांचा फोटो बॅनरवर वापरण्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. या प्रकरणी प्रथम कुणीही कोर्टात जाणार नसल्याचे ठरले होते. पण स्वतः पवार साहेब फोटोवरून कोर्टात जात असतील, तर कोण काय करणार?
अजित पवारांचे 5 जुलैचे भाषण ऐकले तर आमच्या सर्वांचा पक्ष एकच असल्याचे स्पष्ट होते, असे मुश्रीफ म्हणाले.
रोहित पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्ला रोहित पवार “साहेबांचा संदेश’ नामक कार्यक्रमाअंतर्गत राज्यव्यापी दौरा करत आहेत. त्यांनी गुरुवारी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
अनेक नेत्यांनी 1998 मध्ये हसन मुश्रीफ यांना संधी न देण्याचा आग्रह धरला होता. पण शरद पवारांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना संधी दिली. पण आता राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी व नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत, असे ते म्हणाले.