खडकाळी परिसरातील एका हाॅटेलमधून दोन परप्रांतीय बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नदीम याकुब तांबोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगार उपआयुक्त कार्यालयातील विशाल जोगी यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.१३) सायंकाळी ५.२० वाजता ही कारवाई केली आहे. त्र्यंबक पोलिस चौकीमागील परिसरातील गरीब नवाज हॉटेल येथे उत्तर प्रदेशमधील दोन मुले काम करताना आढळली.
एक मुलगा १५ वर्षे ११ महिन्यांचा असून, दुसरा मुलगा १३ वर्षांचा आहे. या दोघांनाही हॉटेल मालकाने स्वत:च्या फायद्यासाठी बालकामगार ठेवून त्यांना नियमापेक्षा कमी पगार देत त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करीत मुलांना क्रूर वागणूक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.