
Maha Kumbh 2025 : लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभमेळ्यासाठी योगी सरकारने सहा हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचे म्हटले जात आहे. यावरून राजकीय वातावरणही तापले होते. मात्र, यावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी किती खर्च करण्यात आला, याबद्दल सांगितले आहे.
शुक्रवारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीत लखनौमध्ये ११४ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी, भाषणादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्याच्या खर्चाबाबत भाष्य केले.
आपल्याला दर सहा वर्षांनी कुंभ आणि दर १२ वर्षांनी महाकुंभ आयोजन करण्याची संधी मिळते. आपण जे काही उपक्रम करतो, त्यामुळे आपल्या पर्यटनाला चालना मिळते. महाकुंभमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटी रुपयांची चालना मिळणार आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
५०००-६००० कोटी रुपये का खर्च केले, असे विरोधकांकडून विचारले जाते. मात्र, ही रक्कम केवळ महाकुंभसाठी नाही तर प्रयागराज शहराच्या नूतनीकरणावरही खर्च करण्यात आली आहे. महाकुंभच्या आयोजनासाठी एकूण १५०० कोटी रुपये खर्च झाले. त्या बदल्यात जर आपल्या अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटींचा फायदा होत असेल आणि राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होत असेल तर ही रक्कम योग्यरित्या खर्च झाली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
जेव्हा उत्तर प्रदेशातील महाकुंभात ५०-५५ कोटी लोक सामील होतील, तेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल. महाकुंभामुळे उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था ३ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. दरवर्षी ‘माघ मेळा’ आणि कुंभमेळ्यादरम्यान, उत्तर प्रदेशला भाडेपट्ट्यावर जमीन मिळते. तसेच, आमचे डबल इंजिन सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून सर्व भाविक आठ वर्षांपूर्वी जिथे जाऊ शकत नव्हते, तिथे भेट देऊ शकतात, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.