“I will keep the top button open, I will put it on in front of my grandfather after forty years!” Rohit Pawar gets emotional during the condolence message

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. या वेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आठवणींना उजाळा देताना भावुक होत अश्रू ढाळले.
“अजितदादा पवार नावाचा जादूगार संपूर्ण महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा हरपला,” अशा शब्दांत रोहित पवारांनी काकांना श्रद्धांजली अर्पण केली.
“वरचं बटण उघडंच ठेवणार…”
भाषणादरम्यान रोहित पवार म्हणाले, “दादा मला नेहमी म्हणायचे, वरचं बटण लावत जा. पण एक मात्र ठरवलं आहे, चाळीस-पन्नास वर्षांनंतर जेव्हा त्यांची वरती भेट होईल, तेव्हा त्यांच्या समोर हे बटण लावेन. तोपर्यंत हे बटण असंच उघडं ठेवणार. कारण ते मला दररोज दादांची आठवण करून देईल.” या भावनिक विधानामुळे सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली.
“शारिरीक वजन कमी, राजकीय वजन वाढवेन”
रोहित पवारांनी अजितदादांच्या मिश्कील सल्ल्यांचाही उल्लेख केला. “एकदा दादा म्हणाले होते, तुझ्या झिपऱ्या वाढल्या आहेत, केस काप. त्यांच्या जाण्याच्या दिवशी मी आदरांजली म्हणून केस कापले. ते नेहमी म्हणायचे, शारिरीक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यांना शब्द देतो, शारिरीक वजन कमी करेन आणि राजकीय वजन नक्की वाढवेन,” असे ते म्हणाले.
“दोषींना तुरुंगात टाकल्याशिवाय शांत बसणार नाही”
अजित पवारांच्या अपघाताचा उल्लेख करताना रोहित पवारांचा स्वर कठोर झाला. “दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, तो कितीही मोठा असला तरी त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा माझा लढा सुरूच राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच कुटुंबीयांना उद्देशून त्यांनी, “तुमच्या राजकीय प्रवासात माझी गरज भासली तर मी कायम तयार असेन,” असे आश्वासन दिले. भावनांनी ओथंबलेल्या या भाषणामुळे सभागृहातील अनेक सदस्यही व्यथित झाल्याचे पाहायला मिळाले.