
Pune Police: पुणे शहर सध्या अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यात अंमली पदार्थ सापडल्याची अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. नुकतेच पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून 36 लाख रुपयांचे “म्याव म्याव” ड्रग्स जप्त केले होते.
आता नवीन माहिती पोलिसांना मिळाली आहे. तपासात पोलिसांना असे दिसून आले की पेडलर आणि त्यांचे ग्राहक, विशेषत: तरुण लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इमोजी वापरत आहेत.
विशिष्ट इमोजी विशिष्ट अंमली पदार्थांसाठी वापरण्यात येत आहेत. पुणे पोलिसांनी ट्विटमध्ये पालकांना त्यांच्या मुलांच्या फोनवरील अशा मेसेजबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
हे ट्विट पुणे पोलिसांनी अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त (26 जून) केले होते.
या वर्षी 1 जानेवारीपासून पुणे शहर पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या 58 प्रकरणांमध्ये गांजा, कोकेन, चरस, खसखस, अफू, ब्राऊन शुगर, मॅजिक मशरूम, चरस तेल आणि एलएसडी साेबत एकूण 7.28 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये तब्बल 82 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
“अमली पदार्थ जप्तीच्या अनेक प्रकरणांमध्ये, आमच्या तपासणीत असे दिसून आले आहे की पुरवठादार, पेडलर्स आणि ग्राहक, विशेषत: तरुण लोक इमोजी वापरून संवाद साधतात.
पेडलर्स आणि ग्राहकांच्या फोनवर, आम्हाला अनेक मेसेज आढळले आहेत ज्यात विशिष्ट इमोजी वापरुन अमली पदार्थांची मागणी करताना दिसत आहेत.
आम्ही पालकांना त्यांच्या मुलांच्या फोनवरील अशा मेसेजबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन करत आहोत. पुरवठादार आणि ग्राहक यांच्यातील कोड म्हणून इमोजीचा वापर जगभरातील तपास यंत्रणांनी केल्याचे आढळून आले आहे,” असे पुणे पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलचे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.
Ganja 🍀😮💨
Cocaine 👃🏼😛❄️
MDMA 💊🍬
Mushrooms 🍄
Meth 🧪⚗️
Xanax 🍫
Heroin 💉