In a major crackdown, the Thane Police Commissionerate seized a massive stock of 600 kg of narcotics worth ₹39 crore and destroyed it.

Photo of author

By Sandhya

​ठाणे पोलीस आयुक्तालयाची धडक कारवाई तब्बल ३९ कोटींचा ६०० किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त करून केला नष्ट!

संपूर्ण देशभरात अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी ‘नशामुक्त भारत अभियान’ अत्यंत प्रभावीपणे राबवले जात आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून ठाणे पोलीस आयुक्तालयाने ड्रग्ज माफियांच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ३९ कोटी ३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा आणि सुमारे ६०० किलो वजनाचा अंमली पदार्थांचा प्रचंड साठा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पूर्णपणे नष्ट केला आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या थेट आदेशानंतर ही मोठी मोहीम राबवून सर्व अंमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा एम.आय.डी.सी. येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत नेऊन शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले, ज्यामुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
व​केंद्र सरकारच्या कायदेशीर निर्देशानुसार आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देण्यासाठी ठाणे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. २६ जून रोजी जागतिक अंमली पदार्थ दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस सह आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, समितीचे सदस्य तथा पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय १) मीना मकवाना आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मुख्य उपस्थितीत ही नष्टीकरण मोहीम पार पडली. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल असलेल्या एकूण ११२ गंभीर गुन्ह्यांमध्ये हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व त्यांच्या विशेष पथकाने सर्व आवश्यक त्या कायदेशीर सोपस्कार आणि तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून या कोट्यवधींच्या ड्रग्जची होळी केली.
व​या धडक कारवाईत नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या अचूक आकडेवारीवर नजर टाकल्यास पोलिसांच्या कामगिरीची व्याप्ती स्पष्ट होते. पोलिसांनी ६६ गुन्ह्यांशी संबंधित ५६४ किलो ६७४ ग्रॅम वजनाचा गांजा नष्ट केला, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १ कोटी १३ लाख ५ हजार रुपये होती. तसेच केवळ २ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ८५ लाख ५० हजार रुपयांचा ८५५ ग्रॅम वजनाचा अत्यंत महागडा हायब्रिड गांजाही खाक करण्यात आला. सर्वात मोठी कारवाई एम.डी. (मेफेड्रोन) या जीवघेण्या अंमली पदार्थावर झाली, ज्यामध्ये २९ गुन्ह्यांतर्गत जप्त केलेले १३ कोटी ४३ लाख रुपये किमतीचे ६ किलो ७१५ ग्रॅम एम.डी. नष्ट करण्यात आले. याशिवाय ७ गुन्ह्यांमधील २० कोटी ९८ लाख २० हजार रुपये मूल्य असलेले २० किलो ९८२ ग्रॅम चरस, ७ गुन्ह्यांमधील २ लाख ९३ हजार ४०० रुपये किमतीच्या १४६७ कफ सिरपच्या बॉटल्स आणि १ गुन्ह्यातील २० लाख ८० हजार रुपयांची १०४ ग्रॅम ब्राउन शुगर अशा प्रकारे एकूण ५९४ किलो ३३२ ग्रॅम वजनाचा ठोस साठा आणि १४६७ कफ सिरपच्या बाटल्या असा एकूण ३९ कोटींपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल एकाच वेळी नष्ट करण्यात आला आहे.
​ही अत्यंत संवेदनशील आणि मोठी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाली. या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्यासह परिमंडळीय नोडल अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, चंद्रहास गोडसे, जयपाल राजपूत, संदीप धांडे, संजय दवणे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड, राजेंद्र निकम, मोहन परब आणि सहाय्यक रासायनिक विश्लेषक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासोबतच पोलीस हवालदार हरीश तावडे, अभिजीत मोरे, अमोल पवार, संदीप चव्हाण, नंदकिशोर सोनगिरे, हुसेन तडवी, अमोल देसाई, अमित सकपाळ, अजय सकपाळ, गिरीश पाटील, अनुप राक्षे, शिल्पा कसबे आणि कोमल लादे यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाच्या अहोरात्र मेहनतीमुळे ही यशस्वी जप्ती व विल्हेवाटीची कारवाई पूर्ण झाली असून, ठाणे पोलिसांनी नशामुक्त समाजासाठी आपला निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page