In Sangvi, one beats with Koita for not lending him cigarettes


कोयत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी
माळेगाव-पानटपरी चालकाने उधार सिगारेट न दिल्याने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून या भांडणाचा जाब विचारणाऱ्या पिता पुत्रांवर कोयत्याने हल्ला करण्याची घटना सांगवी ता.बारामती येथे (दि. १९) रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे.या घटनेत चौघे जण जखमी असून यामध्ये एक वयोवृद्ध महिला आहे.अभिषेक महादेव जगताप,महादेव विश्वनाथ जगताप,गिता महादेव जगताप,काजल महादेव जगताप (सर्व रा.सांगवी ता.बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून त्यांच्या विरोधात प्रतिक सुनील जगताप (रा. सांगवी ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीची सांगवी गावात पानटपरी असुन आरोपी अभिषेक जगताप यास उधार सिगारेट न दिल्याने त्याने शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.हि माहिती फिर्यादीचा लहान भाऊ सार्थक जगताप यास माहित झाल्याने तो व फिर्यादी हे आरोपीच्या घरी त्याचे वडील महादेव जगताप यास सांगण्यासाठी गेले असता त्यांचे काही एक ऐकुन न घेता महादेव जगताप, त्याची पत्नी गिता जगताप व मुलगी काजल जगताप या तिघांनी शिविगाळ व दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.या भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचे वडील सुनील जगताप हे भांडण सोडवण्यासाठी गेले होते.यावेळी अभिषेक जगताप याने घरातील कोयता घेऊन सुनील जगताप यांच्या डोक्यात पाठीमागून वार केला.यावेळी आपल्या वडिलांना वाचवताना सार्थक मधे गेल्यावर त्याचेवरही आरोपीने कोयत्याने डोक्यावर वार केला.तसेच दुसरा वार करत असताना बचाव करताना करंगळीला जखम झाली आहे.याचवेळी फिर्यादीची आजी उषा जगताप या घटनास्थळी आल्या असता त्यांना गिता जगताप व काजल जगताप यांनी ढकलून दिल्याने त्यांच्या हाताला लागुन त्या जखमी झाल्या आहेत.
या भांडणात कोयत्याने डोक्यावर वार झाल्याने जखमी सुनील जगताप, सार्थक जगताप,व फिर्यादीला सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढिल उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर घटनेचा तपास सहायक फौजदार संजय मोहिते करत आहेत.