‘Indu’, the pride of the Sahyadris: The new global face of Bajaj Pune Grand Tour

सध्या पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' चा थरार आणि उत्साह ओसंडून वाहत आहे. ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होत असताना, या स्पर्धेचा शुभंकर (Mascot) असलेल्या 'इंदू' या गोंडस शेकरूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'इंदू' आता केवळ एक प्रतिक राहिली नसून, ती महाराष्ट्राच्या समृद्ध निसर्ग वारशाची जागतिक दूत बनली आहे. पुणे महानगर असो वा दुर्गम गावखेडी, सर्वत्र या 'इंदू'चीच चर्चा असून, त्यानिमित्ताने शेकरू आणि पुण्याचं अतूट नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
शेकरू आणि पुण्याचे नाते समजून घेण्यासाठी आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भीमाशंकरच्या घनदाट अरण्यात जावे लागते. भीमाशंकराचा पावन परिसर आणि भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या भीमाशंकर अभयारण्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. समुद्रसपाटीपासून १ हजार २०० मीटर उंचीवर वसलेले हे अभयारण्य सुमारे १३ हजार ७८ हेक्टर क्षेत्रात पसरले असून १९८५ मध्ये त्याला अधिकृतरीत्या अभयारण्य घोषित करण्यात आले. प्रतिवर्षी येथे पडणारा सुमारे ४ हजार मिलीमीटर पाऊस इथल्या जमिनीला आणि वनराईला वर्षानुवर्षे समृद्ध करत आला आहे. या जंगलाचे संवर्धन करण्यात इथल्या स्थानिक आदिवासी बांधवांनी आणि ऐतिहासिक ‘देवराई’ परंपरेने मोलाचा वाटा उचलला आहे.
याच समृद्ध जंगलाचा मानबिंदू म्हणजे महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला ‘शेकरू’ (Giant Squirrel). खरं तर, भीमाशंकर अभयारण्याची स्थापनाच प्रामुख्याने या मोठ्या खारीच्या अधिवासाला संरक्षण देण्यासाठी करण्यात आली होती. शास्त्रोक्त भाषेत ‘रॅटुफा इंडिका’ म्हणून ओळखली जाणारी ही तांबूस खार केवळ समृद्ध जंगलाचे प्रतीक नसून सह्याद्रीच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा दुवा आहे. भीमाशंकरचे स्थानिक नागरिक याला आदराने ‘भीमाशंकरी’ म्हणून ओळखतात.
शेकरूचे दिसणे अत्यंत मोहक असते. गुंजिसारखे लाल भडक डोळे, अंगावर तपकिरी तलम कोट, पोटावर पिवळसर पट्टा आणि लांबलचक झुपकेदार शेपूट ही त्याची वैशिष्ट्ये पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. हे प्राणी अत्यंत लाजाळू असून प्रामुख्याने फळे, फुले आणि झाडांची साल खाऊन आपले जीवन जगतात. एकांतात राहणे पसंत करणारा हा प्राणी वर्षातून एकदाच एका पिल्लाला जन्म देतो. त्यामुळेच ही प्रजाती दुर्मिळ मानली जाते.
अशा या देखण्या आणि दुर्मिळ शेकरूला म्हणजेच ‘इंदू’ला ‘बजाज पुणे ग्रँड टूर’चा शुभंकर म्हणून निवडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. या स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना महाराष्ट्राच्या या राज्यप्राण्याची आणि भीमाशंकरच्या निसर्गवैभवाची ओळख होत आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा हा संदेश पोहोचवणे, ही खरंच एक सुखावह बाब आहे. ‘इंदू’च्या या प्रवासात आता अवघा महाराष्ट्र सामील झाला असून, सह्याद्रीचे हे वैभव जागतिक नकाशावर झळकत आहे.
संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे