
मुंबई : ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटवण्यात यावी, अशी मागणी थेट माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. याचे पत्र त्यांनी सरकारला पाठवले. ज्यानंतर मोठे वादळ निर्माण झाले. धनगर समाजाकडून याला विरोध करण्यात आला. संभाजीराजे यांनी हे पत्र देवेंद्र फडणवीस यांना देखील दिले. मात्र, यावरून मोठे राजकारण रंगताना दिसतंय. आता संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलीये.
संभाजीराजे म्हणाले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीची कुठेही नोंद नाहीये. डाव्या विचारसरणीचे इतिहासकार असो किंवा उजव्या सरणीचे कोणीही सांगितले नाही की, त्यांच्याकडे वाघ्या कुत्र्याच्या समाधीची काही नोंद आहे. शिवाजी महाराजांचे त्यावेळी अनेक कुत्रे असू शकतात, हे मी नाकारतच नाहीये. वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाहीये. यावेळी संभाजीराजे यांनी रायगडावरील जीर्णोद्वाराची वेळीचे फोटोही दाखवले.
वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि त्याचे स्मारक बांधले गेले. माझे म्हणणे आहे की, सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावे. मला पण बोलवावे आणि जे विरोध करत आहेत, त्यांनाही बोलवावे आपण समोरा समोर बोलू. राजसंन्यास नाटकातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा आहे. कोणालाही आवडेल का? वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची उंची ही शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे. हे कोणत्या शिवभक्ताला आवडेल? अनेक मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे, त्यांच्या समाधीचा अजून कुठेही उल्लेख होत नाहीये आणि वाघ्या कुत्र्याचा स्मारक उभारले.
एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजी महाराज होळकर कशाला मदत करतील? माझे तर म्हणणे आहे की, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करत आहात. तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. राजर्षी शाहू महाराज आणि तुकोजी महाराज होळकर हे जवळचे मित्र होते. छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे किती जास्त जवळचे संबंध आहेत, हे सांगताना संभाजीराजे हे दिसले. घाडगे आणि होळकरांची सोयरिक शाहू महाराजांनी घडवून आणली. धनगर समाज किती जास्त विश्वासू आहे हे सांगताना संभाजीराजे दिसले.
संभाजीराजे म्हणाले की, मला ज्याने सांभाळले आणि ज्यांनी मला जेवण दिले तो मुख्य कुक धनगर समाजाचे आहेत. आयुष्य त्यांनी तिथे नवीन राजवाड्यात काढले. माझा सेवक जो माझा चालक आहे तो इतका विश्वासू आहे तो धनगर समाजाचा आहे. माझा अंगरक्षक दुसरा कोणी नाही तर धनगर समाजाचा आहे. म्हणजे इथे कुठे जातीचा विषय आहे? विषय जातीचा नाहीये, विषय वेगळ्या मार्गावर नेला जातोय. आपण वाघ्या कुत्र्याचे स्थलांतर करू शकतो. संभाजीराजेंनी सरकारला अल्टीमेडम दिल्याचे सांगितले जाते, त्यावरही त्यांनी भाष्य केले.