चुलतीचा पुतण्याने बिबट्याचा बनाव करून काढला काटा!

दौंड,ता.०४ : दौंड तालुक्यातील कडेठाण येथे दि.७
डिसेंबर २०२४ रोजी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात लताबाई बबन धावडे (वय ५०) या महिलेचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या नावावर खपवलेला महिलेचा खून तब्बल ३ महिन्यानंतर यवत पोलिसांनी व नागपूरच्या प्रयोगशाळेने अत्यंत सखोल तपासात उघड केला आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक बापुराव दडस यांनी दैनिक संध्या प्रतिनीधी संजय सोनवणे याना दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती, यवत पोलीस ठाण्यात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. भारतीय नागरिक सुरक्षा सहिंता कलम १९४अन्वये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचा तपास करीत असताना कोणत्याही वन्यप्राण्याने हल्ला करून मृत्यू झालेला नसल्याचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्याच अनुषंगाने सखोल
तपास करून आरोपी सतीलाल वाल्मिक मोरे (वय ३०, सध्या रा.कडेठाण ता.दौंड,जि.पुणे मूळरा.तिकी ता.चाळीसगाव,जि.धुळे) व अनिल पोपट धावडे (वय ४०, रा.कडेठाण ता.दौंड,जि.पुणे) यांनी आपसात संगनमताने लता बबन धावडे यांना अनैतिक सबंधातून जीवे ठार मारण्याचा कट रचून तिचे तोंड व डोके दगडाने ठेचून तिला जीवे ठार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिराजदार,उपअधिक्षक बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण देशमुख व पोलिस निरीक्षक सलिम शेख यांनी पोलिस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे गुरुनाथ गायकवाड,अक्षय यादव,संदीप देवकर,विकास कापरे,महेंद्र चांदणे,महेंद्र फणसे,भानुदास बंडगर,हिरालाला खोमणे या पथकाच्या मार्फत तपासाची सुत्र हाती घेतली होती. पोलिसांनी सोमवारी (ता.३) महीलेचा पुतण्या अनिल धावडे व गडी सतीलाल यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.आरोपींकडे केलेल्या सखोल तपासात महीलेचा बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याचे समोर आले. आरोपींनी उसाच्या शेतात तोंड दाबुन दगडाने ठेचुन खुन केल्याचा प्रकार उघड झाला.पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.