मागील 70 वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण न देणार्यांचे नाव शासनाने जाहीर करावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणार्या मनोज जरांगे-पाटील यांनी महाड येथे झालेल्या जाहीर सभेत केली.
शासना मार्फत 24 डिसेंबर रोजी आरक्षणासंदर्भातील घोषणा होईल. दरम्यान 70 टक्के आरक्षणाची कामे पूर्ण झाल्याने समाज बांधवांनी आपल्या लेकरा-बाळांच्या भवितव्यासाठी एकसंध राहून शांततेच्या मार्गाने पुढील आंदोलन करावे, असे सूचित केले.
येत्या एक डिसेंबरपासून प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण करून समाज संघटित करण्याचे आदेश त्यांनी याप्रसंगी उपस्थिती समाजबांधवांना दिले.
सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे याकरता मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलना संदर्भात मनोज जरांगे-पाटील आपल्या महाराष्ट्रव्यापी दौर्यामध्ये शनिवारी रात्री किल्ले रायगड येथे दाखल झाले.
रविवारी सकाळी नऊ वाजता पायी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, राज दरबार, तसेच होळीचा माळ येथे त्यांनी छत्रपतींना अभिवादन करून आशीर्वाद घेतले.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी, कोणत्याही परिस्थितीत 24 डिसेंबर नंतर मराठा आरक्षण प्राप्त होणार असल्याने आता सर्व समाज बांधवांनी एकसंधपणे या लढ्याकरता सिद्ध होण्याचे आवाहन केले.