मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी आम्ही गिरीश महाजनांना 4 दिवसांचा वेळ दिला होता, पण ‘हा वेळ पुरेसा नसून 1 महिन्यांची मुदत द्या, नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो,’ असं महाजनांनी सांगितले.
आता महाजनांनी वेगळी विधाने करून मराठा समाजाला नडण्याचे काम करू नये, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका रविवारी छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे. त्यावर जरांगे-पाटील यांनी महाजनांना सुनावले आहे.
जरांगे-पाटील म्हणाले की, महाजनांचे सर्व रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. माध्यमांचे व्हिडीओही आहेत. पूर्ण राज्यात ते व्हायरल करू. ‘संकटमोचक’ महाजनांनी भरकटल्यासारखी वक्तव्ये करू नयेत.
आमचा महाजनांवर विश्वास असल्याने तीनवेळा व्यासपीठावर मानसन्मान दिला. आता त्यांनी फडणवीसांचे नाव खराब करू नये, असे ते म्हणाले.
एकट्या छगन भुजबळांचे ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.