जरांगे-पाटील : सरकारला वाकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Photo of author

By Sandhya

जरांगे-पाटील

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आज डोक्यावरून हात फिरवला. यामुळे आंदोलनाला हत्तीचे बळ आले आहे. आता आम्ही कोणालाच घाबरत नाही.

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला वाकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अर्धवट आरक्षण दिले तर सरकारला जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी दिला.

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींसह शाहू महाराज यांनी अंतरवाली सराटी येथे जरांगे-पाटील यांची भेट घेतली. विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला.

माझ्यासह अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, असे सांगत शाहू महाराज यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा-कुणबी एकच असल्याचेही शाहू महाराज यांनी यावेळी सांगितले.

शाहू महाराज यांनी सुमारे पंधरा मिनिटे जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली. प्रकृतीची काळजी घ्या, तुमची मराठा समाजाला, महाराष्ट्राला गरज आहे.

नारळपाणी घ्या, औषध उपचार घ्या, आरोग्य अबाधित ठेवून तुम्ही आंदोलन करा, अशी विनंती शाहू महाराज यांनी केली. सरकारकडून मराठा समाजावर अन्याय केला जात आहे.

तो सहन करणार नाही, असे सांगत जरांगे-पाटील यांनी शाहू महाराज यांच्या विनंतीनुसार एक ग्लास पाणी घेतले. वैद्यकीय तपासणी तसेच नारळपाणी पिण्यास मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.

जरांगे-पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आज येथे भेट दिली आहे. त्यामुळे सरकारने आंदोलनाचे गांभीर्य ओळखावे. माझ्यामागे छत्रपती शिवरायांची ताकद आहे.

माझ्या अंगात शक्ती आहे तोपर्यंत मी लढत राहणार. आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. शाहू महाराज म्हणाले, जरांगे-पाटील मोठ्या ताकदीने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी लढत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळणार आहे.

जरांगे-पाटील यांच्यासारख्या नेत्यामुळे आरक्षण मिळेल, असा विश्वास आहे. त्यामुळे समाजाने एकी कायम ठेवावी. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवा. हिंसक मार्गाचा अवलंब करू नका.

आत्महत्यांसारखे पाऊल उचलू नका, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई आदींनी जरांगे-पाटील यांना पाणी घेण्याची विनंती केली.

यावेळी अमर निंबाळकर, अ‍ॅड. सतीश नलवडे, हर्षल सुर्वे, माणिक मंडलिक, अवधूत पाटील, शुभम शिरहट्टी, उदय लाड, मनोज नरके, शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, लता जगताप, गीता हसूरकर, रूपाली बराले आदी उपस्थित होते.

घोषणांनी दुमदुमली अंतरवाली सराटी शाहू महाराज यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे-पाटील यांनी पाणी घेतले. त्यानंतर हजारो मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी अंतरवाली सराटीचा परिसर दुमदुमून गेला.

जरांगे-पाटील कुटुंबीयांची शाहू महाराजांनी घेतली भेट मनोज जरांगे-पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची शाहू महाराज यांनी भेट घेतली. कुटुंबातील सदस्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

जरांगे-पाटील यांची आई, वडील, पत्नी, मुली यांना भेटून संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी दिला. लाठीमारात जखमी झालेल्यांच्या घरीही जाऊन त्यांनी विचारपूस केली.

Leave a Comment