पुणे | शरद पवारांच्या आगमनापूर्वी जयंत पाटील-अजित पवारांची ३० मिनिटांची बंद दाराआड चर्चा

Photo of author

By Sandhya



पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) दाखल होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात बंद दरवाजाआड भेट झाली. दोघांमध्ये तब्बल ३० मिनिटे चर्चा चालली, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा कुजबूज सुरु झाली आहे. जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, या चर्चांना नव्याने बळ मिळाले आहे.

यापूर्वी जयंत पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, सातत्याने सुरू असलेल्या गुप्त बैठकींमुळे ते वेगळा निर्णय घेणार का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

कधी कुठे कशी भेट?
पुणे येथील मांजरी भागात असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. मात्र, शरद पवार यांच्या आगमनापूर्वीच जयंत पाटील आणि अजित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या केबिनमध्ये बंद दाराआड चर्चा केली.

महापालिका निवडणुकांपूर्वी धक्का?
विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या गटात शरद पवार यांच्या अनेक निकटवर्तीय नेत्यांचा संपर्क असल्याच्या चर्चा वारंवार होत आहेत. जयंत पाटील यांचे नावही या चर्चेत अनेकदा आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, सांगलीत अजित पवार यांच्या गटाला बळकट करण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील हे महत्त्वाचे ठरू शकतात.

जयंत पाटील म्हणतात शरद पवारांसोबतच
याबाबत जयंत पाटील यांनी अनेकदा स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यांच्या भेटीगाठींमुळे चर्चांना अधिक जोर मिळत आहे. आजही शरद पवार येण्यापूर्वी झालेल्या या तीस मिनिटांच्या चर्चेचा भविष्यात काय परिणाम होईल, जयंत पाटील काही महत्त्वाचा निर्णय घेतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Comment

You cannot copy content of this page