जयंत पाटील : भाजपची ‘गॅरंटी’ चायनीज मालासारखी; चले तो चांद तक, नहीं तो शाम तक

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

सध्या सर्वत्र मोदी की गॅरंटी असे कॅम्पेन चालवले जात आहे. जाहिरातींमध्येही याचा प्रचार केला जात आहे. पण भाजपच्या गॅरंटीची परिस्थिती चायनीज मालासारखी आहे. चले तो चांद तक, नही तो शाम तक असा हा प्रकार आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे दाखल झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत यात्रेचे स्वागत करण्यात आले. तेव्हा जयंत पाटील बोलत होते.

“संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्वात अस्वस्थ जर कोणी असेल तर तो शेतकरी आहे. यापूर्वी देखील देशातला शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला होता. त्यावेळी ७०० पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले. पण दिल्लीचं सरकार हललं नाही.

आता पुन्हा एकदा आमचा शेतकरी बांधव शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून लढतो आहे. इतर कसली नको पण आधारभूत किंमत मिळण्याची गॅरंटी आम्हाला द्या”, असे आवाहन जयंत पाटलांनी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला केले.

“कांद्याचे भाव पडले आहेत. निर्यात बंदी उठवण्याची दानत या सरकारची नाही. केळी, संत्री बांगलादेश मध्ये निर्यात करता येत नाही. द्राक्षाची काही वेगळी अवस्था नाही. सोयाबीनचे दर पडलेले आहेत. सत्तेवर येण्याआधी जे कापसाला दहा हजार रुपये मागत होते, सोयाबीनला सहा हजार रुपये मागत होते ती लोकं आता काहीच बोलायला तयार नाही.

देशभरातील शेतकऱ्यांनी आता संघटित व्हायला पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. “काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्यांनी भारतभर पदयात्रा काढली, आता न्याय यात्रेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र टिव्हीवर, मोबाईलवर ते कुठेच दिसणार नाही. कारण तुमच्या पर्यंत काय पोहचवायचं याचा निकाल झालेला आहे.

जे सोयीचे आहे तेच तुमच्या डोळ्यांना दिसतं. त्यामुळे सत्य पुढे येतच नाही. घराघरात बेकारी, महागाई आहे, शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांनी, शेतकऱ्यांनी जागरूक झाले पाहिजे. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भविष्यकाळात तुम्ही लढाल,” असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page