जयंत पाटील : घटक पक्षांशी चर्चा करूनच जागावाटप…

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

आगामी विधानसभा निवडणूक जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीला व राष्ट्रवादीला मिळालेला प्रतिसाद पाहता आम्ही पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करतोय. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांशी चर्चा करून जागावाटपाचा निर्णय होईल.

आमच्यातच बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेऊन मित्रपक्षांशी चर्चेनंतरच ज्या जागा आम्हाला सुटतील, त्यावरच आम्ही अर्ज मागविणार आहोत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान, विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हिंदू, मुस्लिम दरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणकोणत्या घटनांतून होतोय यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यांच्याकडून विशाळगडासारख्या घटनांच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी भवनात विधानसभानिहाय आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरा सुरू असून, २८ तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांचा दौरा पूर्ण करणार आहोत. महाविकास आघाडी व राष्ट्रवादीला जनतेने लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

विधानसभेला महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’ सातारा लोकसभेच्या पराभवावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘काहींनी चांगले काम केले त्यांचे मी आभार मानतो; पण काही ठिकाणी बळाचा व पैशाचा प्रचंड वापर झाला.

काही भागांत ज्यांनी काम करतो म्हणून सांगून काम सुरू केले व पुन्हा बंद केले, असे एक- दोन मोठे पुढारी निघाले. त्यामुळे आमचा थोडक्या मतांनी पराभव झाला; पण पिपाणीने आमची मते खाल्ली.’’

कऱ्हाड उत्तरला शिंदेंना मताधिक्य आहे; पण तेथील कार्यकर्त्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. तेथील बाळासाहेब पाटील हे आमदार व माजी मंत्री असून, ते खंबीरपणे पुन्हा सुरुवात करतील.

लोकसभेत कऱ्हाड दक्षिण व उत्तरला जवळचा उमेदवार नसल्यामुळे आमच्या मतांची घसरण झाली असेल, असे कारणमीमांसा त्यांनी केली. जिल्ह्यात आलेल्या वाघनखांबाबत ते म्हणाले, ‘‘भाडे देऊन वाघनखे आपल्याकडे आली आहेत. शिवप्रेमी त्यांचे दर्शन घेतील. याबद्दल आपुलकी आहे.’’

Leave a Comment