जयंत पाटील : कोण असली कोण नकली जनताच निकाल लावेल ! 

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

राज्यात दोन पक्ष फोडूनही भाजपचे समाधान झालेले दिसत नाही. त्यांना पुन्हा सत्तेत येण्याचा भरवसा नाही. यामुळेच ते असे बोलतात. कोण असली कोण नकली याचा फैसला आता महाराष्ट्रातील जनताच लावेल; असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर असली नकली असा हल्ला चढविला होता.

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे निवडणुकीतील कधीकाळी अजित दादा पवार यांनी त्यांच्या प्रचारासाठी केलेली भाषणे आठवावीत. केलेल्या विकास कामाच्या भरवशावरच त्या निवडून येतात. त्यामुळे यावेळी देखील त्या निवडून येतील असे सांगितले.

सुजय विखे पाटील यांनी डॉ.अमोल कोल्हे यांच्या संदर्भात केलेल्या टीकेला उत्तर देताना बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यात अमोल कोल्हे यांची चांगली कामगिरी आहे. ती सुरू झाल्यानंतर आपण घोडीवर बसणार असे सांगितले होते.

सुजय विखे पाटील यांना कदाचित ग्रामीण भागात या शर्यतीचे किती वेड आहे, किती मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग यात गुंतलेला आहे. याची कल्पना नसावी म्हणून ते तसे बोलले असावेत असेही सांगितले.

दरम्यान, धैर्यशील मोहिते यांनी भाजपचा दिलेला राजीनामा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते लढणार असल्या संदर्भात मला फारसे माहित नाही; असे सांगत त्यांनी हशा पिकविला.

इंडिया आघाडीला देशभरात चांगला प्रतिसाद असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे इंडिया आघाडीने आपल्या जाहीरनाम्यातून लक्ष दिले असल्याने चांगले कामगिरी करेल.

भाजप 45 पारचा राज्यात दावा करत असताना तीन जागा त्यांनी कोणत्या सोडल्या हे तरी सांगावे जेणेकरून आम्ही समाधान मानून घेऊ असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 

शिंदे गटात गेलेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी ईडीचा वापर करणे ही भाजपची संस्कृती नसल्याचे विधान केले, यावरून जे बोलले ते शिंदे सेनेवर कशा प्रकारचा दबाव होता हे सांगणारे आहे.

आता जनतेनेच यातून बोध घ्यावा व त्याचा निकाल लावावा असे आवाहन पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेक येथील सभेत आपल्याला शिव्या देणाऱ्यांच्या रांगेत आता शरद पवार देखील सहभागी झाले आहेत असे विधान केले.

या संदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी शरद पवार यांनी राजकीय आयुष्यात कुणालाही शिव्या दिलेल्या नाहीत, राजकीयदृष्ट्या विरोधकांवर धोरणात्मक टीका करणे गैर नाही असा पलटवार केला. यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे,माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील दिलीप पनकुले आदि उपस्थित होते.

Leave a Comment