जयंत पाटील : “लाडकी बहीण, लाडका भाऊ झाला, आता लाडकी बायको योजना सुरू करा’’

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून आणण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीकडून या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना लाभ होईल, असा दावा केला जात आहे.

तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील नेतेमंडळी या योजनेची खिल्ली उडवत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडून  निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात येत असलेल्या योजनांवरून टोला लगावला आहे.

लाडकी बहीण, लाडका भाऊ झाला, आता लाडकी बायको योजना सुरू करा, असा खोचक सल्ला जयंत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले की, सध्याच्या घडीला राज्यातील महायुती सरकार भेदरलेल्या स्थितीत आहे.

काय करू आणि मतं मिळवू असं त्यांना झालेलं आहे. त्यांनी लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आणल्या आहेत. आता लाडकी बायको अशी एक योजनाही आणा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.  

यावेळी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही जयंत पाटील यांनी टीका केली. तसेच या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा आरोप त्यांनी केला.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. तसेच या अर्थसंकल्पामधून कुठलीही ठोस योजनाही सादर केली गेलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. 

Leave a Comment

You cannot copy content of this page