
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मोटारसायकल चोरणारा सराईत चोर अटकेत
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मंचर, घोडेगाव, नारायणगाव, ओतूर या परिसरातून मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. सदर मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक फौजदार साबळे, पोलीस हवालदार वारे, नवले सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून पुढील तपास सुरू केला. सदर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता प्रत्येक ठिकाणी तोच चोरटा असल्याचे दिसून आले. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा इसम हा रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर राहुल अशोक दाते राहणार मंचर हा आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वी देखील बरेच गुन्हे दाखल आहेत. तरी तो आज त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटरसायकल ह्या घोडेगाव नारोडी फाटा येथे विक्रीसाठी आणणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत समजले त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच घोडेगाव पोलिस स्टेशन कडील पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन त्याच त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल अशोक दाते (वय २५ राहणार मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून घोडेगाव, मंचर, नारायणगाव,ओतूर या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकल तसेच नारायणगाव येथून चोरीस गेलेला एक मोबाईल असा १,११,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीस घोडेगाव पोलीस स्टेशनने अटक केली आहे.पुढील तपास सुरू आहे.