राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी नुकत्याच झालेल्या गुप्त बैठकीवरून अद्यापही राजकीय तर्कवितर्क सुरू असताना ही बैठक चोरडिया यांच्या नाईक बेटाच्या तब्बल तीन हजार कोटींच्या टीडीआरचा मार्ग सुकर होण्यासाठी घडवून आणल्याची चर्चा आहे.
त्याचवेळी या टीडीआरच्या प्रस्तावाची फाईल विकसकाने नुकतीच मागे घेतली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आल्यामुळे नक्की काय गोलमाल सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेसमवेत जाण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.
अशातच काका-पुतण्याची गुप्त बैठक उद्योगपती चोरडिया यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी झाल्याची बातमी फुटली. या बैठकीवरून अनेक राजकीय आडाखे बांधले गेले. मात्र, ही बैठक घडवून आणण्यामागील सर्वात मोठी बाब आता समोर आली आहे.
पुण्यातील मुळामुठा संगमावरील चोरडिया यांच्या मालकिच्या नाईक बेटाच्या 32 एकर 22 गुंठे जागेवर महापालिकेच्या विकास आराखड्यात उद्यानाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. या जागेचा टीडीआर चा प्रस्ताव महापालिकेकडे दाखल केला गेला होता.
या टीडीआरचे बाजारमूल्य 3 हजार कोटी पेक्षा अधिक आहे. हा टीडीआर दिला गेल्यास त्याचा शहरावर मोठा आघात होणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मोठे दिव्य पार पाडावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
दरम्यान यासंबंधीचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या विधी विभागाने दि. 1 ऑगस्ट रोजी जाहीर नोटीस देऊन त्यावर हरकती सूचना मागविल्या होत्या. मात्र, ही नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच हा प्रस्ताव विकसकाने मागे घेतला.