कराड-पाटण राज्यमार्गावर विहे गावच्या हद्दीतील विहिरीत जीप कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवार, दि. 27 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिस यंत्रणेने भर पावसात बचावकार्य सुरू ठेऊन क्रेनच्या मदतीने जीप बाहेर काढली आहे. मात्र, जीपमध्ये कोणीही आढळून आले नसल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.
अपघातग्रस्त क्रुझर जीप (क्र.एम.एच. 05 ए 6261) ही विहिरीतून बाहेर काढण्यात आली असून, ती मल्हारपेठ येथील असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास विहेवरून मल्हारपेठकडे निघालेली गाडी विहे स्मशानभूमी जवळ असलेल्या विहिरीतकोसळल्याची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरिक्षक उत्तम भापकर, अजित पाटील व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
विहिर खोल असून पाण्याने भरल्यामुळे नेमकी कोणती गाडी आतमध्ये पडली आहे, याबाबत निश्चित समजून येत नव्हते. त्यामुळे तात्काळ क्रेन बोलावून गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
रात्रीची वेळ व पडणारा पाऊस यामुळे गाडी बाहेर काढताना अडचणी येत होत्या. त्यातच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस वाहनांना वाट काढून देत होते.
दोन तासाच्या प्रयत्नानंतर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने जीप बाहेर काढण्यात आली. पोलीसांनी जीपमध्ये कोणी आहे काय हे शोधले असता आतमध्ये कोणीही आढळून आले नाही. ही जीप मल्हारपेठ येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जीप विहिरीत पडली तेव्हा त्यामध्ये कोण-कोण होते याबाबत स्पष्ट झालेले नाही. जीपचालक किंवा अन्य कोणीही मिळून आले नसून पोलीसांकडून रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य तसेच अधिक माहिती घेण्याचे काम सुरू होते.