धनंजय मुंडे प्रकरणात करुणा शर्मांचा नवा पुरावा – कोर्टात इच्छापत्र सादर

Photo of author

By Sandhya


मुंबई : करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या निर्णयाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कोर्टात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी आज माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी करुणा शर्मा यांच्याकडून कोर्टात धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र सादर करण्यात आलं आहे. या अंतिम इच्छापत्रात करुणा शर्मा यांची पहिली पत्नी असा उल्लेख करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रात चार मुलांचीदेखील नावे आहेत. सादर केलेलं इच्छापत्र खरं असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत. दुसरीकडे करुणा शर्मांनी सादर केलेलं इच्छापत्र खोटं असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. दरम्यान, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या सादर केलेल्या इच्छापत्रात माझ्या मृत्यूनंतर मुलगा सिशीव माझे अंत्यसंस्कार करणार, असा उल्लेख आहे.

करुणा शर्मांनी सादर केलेल्या अंतिम इच्छापत्रात काय म्हटलंय?
कोर्टाने करुणा शर्मा यांना काही कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांनुसार करुणा शर्मा यांनी कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांमध्ये धनंजय मु्ंडे यांचे अंतिम इच्छापत्रदेखील सादर करण्यात आले. हे अंतिम इच्छापत्र 2017 मध्ये बनवल्याची नोंद आहे. या इच्छापत्रात करुणा मुंडे या पहिल्या पत्नी आहेत, असा उल्लेख आहे. तर राजश्री मुंडे या दुसऱ्या पत्नी असल्याचा उल्लेख आहे.

दोन्ही पत्नींपासून किती अपत्ये आहेत, त्यांची काय नावे आहेत हे सर्व इच्छापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. करुणा मुंडे यांच्यापासून असलेला मुंडे शिसीव मुंडेच माझ्यावर अंत्यसंस्कार करेल, असं म्हटलं आहे. तसेच त्यांची मी संपूर्णपणे जबाबदारी घेतली आहे. त्यांचा मी सांभाळ करतो आहे, असंही इच्छापत्रात म्हटलं आहे. करुणा मुंडेंनी स्वीकृतीपत्र देखील कोर्टात सादर केले. स्वीकृती पत्रात 9 जानेवारी 1998 ला धनंजय मुंडे यांच्यासोबत वैदिक पद्धतीने लग्न झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

इच्छापत्र खोटं असल्याचा वकिलांचा युक्तिवाद
हे दोन्ही कादपत्रे खरे असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला. पण धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी तो दावा फेटाळला.करुणा शर्मा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर ती कागदपत्रे बनावले आहेत. त्या संदर्भात त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. या प्रकरणी आजच निकाल येण्याची शक्यता आहे किंवा निकाल राखला जावून निकालाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page