कात्रज घाट परिसरातील भिलारेवाडी हद्दीतील नवीन बोगद्याजवळील जंगलात रानगवा मुक्त संचार करताना आढळून आला. रस्त्याने जाणार्या प्रवाशांनी या गव्याची छायाचित्रेही मोबाईलमध्ये काढली आहेत.
हा गवा कोणत्या जंगल परिसरातून या ठिकाणी आला, हे आताच सांगत येणे कठीण असल्याचे वन विभागाचे वनपल संभाजी गायकवाड यांनी सांगितले.
परिसरातील भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी ही गावे वन विभागालगत असून, या परिसरात विविध पक्षी व वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. रानडुकरे, बिबट्या, मुंगूस, मोर, वानर, रानमांजर यांसह विविध प्राणी या भागात आढळून येतात.
रानगव्याचे देखील कात्रज घाटामध्ये दर्शन झाल्याने आनंदच वाटत असल्याचे माजी सरपंच विक्रम भिलारे यांनी सांगितले.