PUNE : खडकवासला धरणसाखळी पाणी साठविण्यासाठी सज्ज; कामे युद्धपातळीवर सुरू

Photo of author

By Sandhya

खडकवासला धरणसाखळी पाणी साठविण्यासाठी सज्ज

पुणे शहर व जिल्ह्यातील जवळपास एक कोटी रहिवाशांना तसेच 60 हजारांहून अधिक हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरणसाखळी पाणी साठविण्यासाठी सज्ज झाली आहे.

पानशेत, वरसगाव व खडकवासला या धरणांच्या पावसाळी देखभाल दुरुस्तीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. जून महिना संपत आला तरी धरणक्षेत्रात पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे अद्यापही पाणीसाठ्यात पावसाची भर पडली नाही.

पाणी साठविण्यासाठी धरणे पूर्ण क्षमतेने सज्ज व्हावीत, यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे दरवाजे, गेट तसेच टॉप लेन आदींचे ऑयलिंग, रंगरंगोटी आदी कामे सुरू आहेत.

पूर्णक्षमतेने धरणात पाणीसाठा व्हावा तसेच विनाअडथळा सांडव्यातून पाणी सोडता यावे, यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीतील सर्व भागांची सफाई करून रंगरंगोटी, गेटला ग्रीसिंग आणि ऑयलिंग आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

दरम्यान, शेतीचे पाणी बंद करण्यात आले असले तरी पिण्यासाठी पुरेसे पाणी सोडले जात असल्याने तसेच धरणक्षेत्रात कडकडीत उन्हाळा सुरू असल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वेगाने घट सुरू आहे.

शुक्रवारी (दि. 23) धरणसाखळीत 4.26 टीएमसी म्हणजे 14.65 टक्के पाणी शिल्लक होते. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 23 जून 2022 रोजी साखळीत 3.16 टीएमसी म्हणजे 10.83 टक्के साठा होता.

Leave a Comment