![खडकवासला](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2023/06/Untitled-design-2023-06-25T125654.456.png)
पावसाअभावी अल्प पाणीसाठ्याकडे वाटचाल सुरू असलेल्या खडकवासला धरणसाखळीत शनिवारी (दि. 24) मान्सूनचे दमदार आगमन झाले.
पावसाने ओढ दिल्याने धरणसाठ्याकडे लक्ष लागलेल्या पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आशा या पावसामुळे पल्लवित झाल्या आहेत.खडकवासला येथे दिवसभरात 34 मिलिमीटर पाऊस पडला.
धरणसाखळीत सद्य:स्थितीत 4.23 टीएमसी (14.51 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अद्यापही धरणांच्या पाणीसाठ्यात भर पडली नाही.
सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेत व टेमघर येथे प्रत्येकी 10 व वरसगाव येथे 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत-वरसगाव खोर्यात मात्र पावसाचा जोर कमी आहे. अद्याप मान्सून सक्रिय झाला नसल्याने सह्याद्रीच्या डोंगररांगा पावसाचे प्रमाण कमी आहे.
सर्वत्र पावसाळी वातावरण असल्याने मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खडकवासला साखळीतील धरणक्षेत्रात शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली.
जून महिना संपत आला, तरी धरणक्षेत्रात पावसाने दडी मारली होती. शुक्रवारपर्यंत (दि. 23) परिसरात कडकडीत ऊन होते. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास पानशेत, सिंहगड भागात रिमझिम पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर या पावसाचा जोर वाढत गेला.